Nashik Akkalkot Highway : नाशिक : नाशिक ते अक्कलकोट हरितक्षेत्र महामार्ग प्रकल्पाला आता गती मिळताना दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) पुढील 2 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून जमीन संपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात उर्वरित 107.33 हेक्टर जमीन तातडीने संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. बाधित शेतकरी आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता नवे वळण मिळाले आहे.

केंद्र सरकारने सुरुवातीला सूरत ते चेन्नई असा सुमारे 1200 किलोमीटर लांबीचा हरितक्षेत्र महामार्ग उभारण्याचा विचार मांडला होता. मात्र महाराष्ट्रातील काही भागांत शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सूरत ते नाशिक हा टप्पा रद्द करण्यात आला. आता नाशिकपासून पुढील दक्षिणेकडील भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आडगाव येथून सुरू होणारा हा महामार्ग अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर मार्गे अक्कलकोटपर्यंत जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर तालुक्यातील 30 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक तालुक्यातील आडगाव आणि विंचूरगवळी, निफाड तालुक्यातील दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपाणी आणि तळवाले तसेच सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी आणि कहांडलवाडी या गावांचा यात समावेश आहे. एकूण 387.33 हेक्टर जमीन संपादन अपेक्षित असून त्यापैकी सुमारे 280 हेक्टर संपादन पूर्ण झाले आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रातील संपर्क अधिक मजबूत होईल. उद्योगांना जलद वाहतूक सुविधा मिळेल तसेच शेतीमालाची वाहतूक कमी वेळेत होऊ शकते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 374 किलोमीटर आहे. त्यात 152 किलोमीटर भाग 70 मीटर रुंद आणि 222 किलोमीटर भाग 60 मीटर रुंद असेल. 5.6 किलोमीटरचा मार्ग दऱ्याखोऱ्यांतून जाणार आहे. तसेच 27 मोठे पूल आणि 164 लहान पूल व जोडरस्ते बांधले जाणार आहेत.


