Crime News: सिन्नर : नाशिक शहरातील सिल्व्हर लोटस स्कूलबाहेर शाळेचे अध्यक्ष दिलीप पुंजाराम बिन्नर यांच्यावर त्यांच्या वडिलांसह सख्ख्या भावांकडून थेट अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दिलीप बिन्नर, त्यांची पत्नी सोनल बिन्नर, शाळेचे प्रशासक सागर लोणारे आणि मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे जखमी झाले आहेत. गुरुवारी 15 जानेवारी रोजी दुपारी हा प्रकार घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी रोजी होणाऱ्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर साफसफाई सुरू होती. दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास दिलीप बिन्नर यांचे सख्खे भाऊ योगेश बिन्नर, मंगेश बिन्नर आणि वडील पुंजाराम बिन्नर हे कार क्रमांक एमएच 15 जेएच 7059 मधून घटनास्थळी आले. कार चालवत असलेल्या योगेश बिन्नर यांनी थेट सोनल बिन्नर यांच्या अंगावर कार घातली. त्या थोडक्यात बचावल्या, मात्र खुर्चीवर बसलेले दिलीप बिन्नर कारच्या धडकेत गंभीर जखमी झाले.
यानंतर लोखंडी रॉड आणि दगडाच्या साहाय्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी सोनल बिन्नर यांना जमिनीवर पाडून मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेले प्रशासक सागर लोणारे यांनाही मारहाण करण्यात आली. शाळेच्या गेटवर घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असून पोलिसांकडून त्याच्या आधारे तपास केला जात आहे.
या प्रकरणी दिलीप बिन्नर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी योगेश बिन्नर यांना अटक केली आहे. दरम्यान, योगेश बिन्नर यांनीही दिलीप बिन्नर आणि शाळेतील इतर सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. जमिनीच्या वादातून आपल्यावर शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा समांतर तपास सुरू असून या घटनेमुळे सिन्नर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.






