Crime News : जळगाव: जळगाव शहरात अपहरण आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्याचे अपहरण (Kidnnapping) करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. अपहरणकर्त्यांनी तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, शनिपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवान हालचाली करत अवघ्या तीन तासांत अकोला येथे जाऊन तरुणाची सुखरूप सुटका केली. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील गोलाणी मार्केट परिसरात मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी आणि त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश माकोडे नावाच्या व्यक्तीने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांना मामुराबाद रस्त्यावरील एका इमारतीत बोलावण्यात आले. तेथे भाच्याला दोरीने बांधून ठेवण्यात आले, तर मामाला चाकूचा धाक दाखवत बसवून ठेवण्यात आले. आरोपींनी “तू मला मारण्याची सुपारी दिली आहे” असा खोटा आरोप करत त्यांना घाबरवले.
यानंतर दोघांना दुचाकीवर बसवून भुसावळच्या दिशेने नेत अकोला येथे एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. भाच्याला ओलिस ठेवून, त्याला सोडवायचे असल्यास 20 लाख रुपये द्यावे लागतील, असा इशारा देण्यात आला. मात्र, संधी साधून कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. काही तासांतच पथकाने अकोला येथे धाड टाकून यश माकोडे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गणपतलाल माळी यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







