Suicide News: बीड : बीड (Beed) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अशोक काळे यांचे पुत्र पवन अशोक काळे (वय 32) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड शहरातील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Suicide Case

मिळालेल्या माहितीनुसार, पवन काळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला. तातडीने शेजाऱ्यांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घरासमोर जमा झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पवन काळे यांचे वडील अशोक काळे हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडून आले आहेत. या निवडणुकीत पवन यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी प्रचारात मोठी भूमिका बजावली होती आणि तरुणांची फळी उभी करून घरोघरी जाऊन प्रचार केला होता. पवन यांचा स्वभाव मनमिळाऊ होता आणि सामाजिक कामात त्यांना विशेष रस होता. त्यामुळे मित्रपरिवारात आणि परिसरात ते परिचित होते.
अशा परिस्थितीत पवन यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळली नसून, कौटुंबिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पवन यांच्या निधनाने काझीनगर परिसरात शोककळा पसरली असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.







