पुणे: पुणे (Pune News) शहर हे तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण पाट्यांसाठी जगभर ओळखले जाते आणि आता पुन्हा एकदा अशाच एका पुणेरी बॅनरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या लोकांना चपराक बसवण्यासाठी एका ठिकाणी चक्क येथे कचरा टाकणारा मी गाढव आहे असा मजकूर असलेला बॅनर लावला आहे. इतकेच नाही तर हा बॅनर फाडण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंतीही त्यावर केली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाने अनेकदा सांगूनही लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे थांबवत नसल्याने अखेर अशा कडक शब्दांचा वापर करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

एका नागरिकाने सांगितले कि, हे बॅनर पाहून आम्हाला हसू आले पण लोकांना शिकवण्यासाठी अशा पद्धती वापराव्या लागतात ही गोष्ट खूपच गंभीर आहे. काही युजर्सनी तर असेही म्हटले आहे की, लोणावळा सारख्या पर्यटन स्थळी देखील अशा पाट्या असूनही लोक तिथेच कचरा टाकून परिसर घाण करतात. कचरा टाकणे ही केवळ आरोग्यासाठी घातक गोष्ट नसून त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे.
निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणि त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत लिहिलेल्या भिंतीवरच कचरा फेकल्याचा फोटो व्हायरल झाला होता, त्यामुळे केवळ नियम करून चालणार नाही तर लोकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे.







