छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज परिसरात (Shocking News) धावत्या बसमध्ये घडलेला प्रसंग काही क्षणांसाठी सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. मातृत्वाच्या (Chhatrapati Sambhajinagar) असह्य वेदनांनी विव्हळणारी एक गरोदर महिला आणि मदतीसाठी धावणारे प्रवासी. काही मिनिटांतच एसटी बस छोटेखानी दवाखान्यात रूपांतरित झाली आणि दोन जिवांना नवजीवन मिळाले. (Latest Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील बोधरे येथील गोरख गायकवाड हे ऊसतोड कामगार. हंगामासाठी कुटुंबासह पुण्यात गेले होते. सोमवारी सायंकाळी ते गावी परतत होते. प्रवासादरम्यान ज्योती गायकवाड यांना पोटदुखी सुरू झाली. वेदना वाढत गेल्या आणि परिस्थिती गंभीर बनली. पहाटे पुणे–जळगाव मार्गावरील जामनेर आगाराची बस त्यांनी पकडली. सकाळी सुमारे 8.50 वाजता बस वाळूजजवळ पोहोचताच त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या.
चालक एस. एम. माळी आणि वाहक ए. एस. अंभोरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस तात्काळ थांबवली. सुमारे 25 प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने बस थेट वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, परिचारिका उषा गायकवाड आणि आरोग्य पथकाने वेळ न दवडता बसमध्येच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. आशा सेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित प्रसूती पार पडली. ज्योती गायकवाड यांनी निरोगी बाळाला जन्म दिला.
“वेळ दवडणं धोक्याचं होतं. कागदपत्रांपेक्षा माणुसकी महत्त्वाची,” असे डॉ. दाते यांनी सांगितले. संभाव्य अनर्थ टळल्याने कुटुंबीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, आपत्कालीन क्षणी तत्परता आणि मानवतेचा हातच जीव वाचवतो.







