Nanded Crime: नांदेड: नांदेड शहरात सोमवारी अपहरणाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि नांदेड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, घोगरे पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. Nanded Crime

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास जीवन घोगरे पाटील हे सिडको परिसरातून आपल्या चारचाकी वाहनातून जात होते. यावेळी एका स्कार्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांच्या गाडीला अडवून स्कार्पिओमधून उतरलेल्या 6 ते 7 जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले आणि अपहरण केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अपहरणानंतर आरोपींनी घोगरे पाटील यांना अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. पोलिसांनी पाठलाग करत काही वेळातच जीवन घोगरे पाटील यांची सुटका केली. या प्रकरणात अपहरण आणि मारहाणीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या 7 जणांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ गाडीही जप्त करण्यात आली आहे.
सुटकेनंतर जीवन घोगरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या सांगण्यावरूनच आपले अपहरण आणि मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अपहरणकर्त्यांनी ‘चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस’ अशी धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामागे सुमारे 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार आणि राजकीय कारणे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहम्मद अफ्रोज फकीर चालक आणि देवानंद भोळे यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.





