छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण डोंगरावरून खाली कोसळल्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे वडीलही खाली पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी आईनेही खाली उडी घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमागील नेमके कारण तसेच मृतांची अधिकृत ओळख प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डोंगराळ आणि धोकादायक ठिकाणी जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






