Crime News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या आईला मेसेज पाठवत आपण घर कायमचे सोडून जात असल्याचे कळवले आणि त्यानंतर घराबाहेर पडली. “मम्मी, मी घर सोडून कायमची चाललेय, लोकांना सांगून दे,” असा संदेश पाठवल्यानंतर तिचा मोबाईल बंद लागला. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी फुलंब्री येथील सधन कुटुंबातील आहे. तिचे वडील व्यवसायाने बिल्डर असून कुटुंबात कोणतीही आर्थिक अडचण नसल्याचे सांगितले जाते. घरात सर्व काही सुरळीत असताना तिने अचानक असा निर्णय का घेतला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबीयांच्या मते, घरात कोणताही वाद किंवा तणाव नव्हता.
14 फेब्रुवारी जवळ आल्याने शहरात उत्साहाचे वातावरण असताना या घटनेने वेगळेच चित्र निर्माण केले आहे. मुलीचा मेसेज मिळताच कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. अखेर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्याने ती कोणाच्या संपर्कात होती का, याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी तिच्या मोबाईल कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू केली आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तिचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.






