छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Crime News) लाचलुचपत प्रतिबंधक (Chhatrapati Sambhajinagar) विभागाने एका महिला पोलीस अंमलदाराला रंगेहाथ पकडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली लता बाळासाहेब दराडे वय 37 हिला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने गारखेडा येथील तिच्या घरी अटक केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका महिला आणि तिच्या पुरुष मित्राविरुद्ध आलेल्या तक्रारीत कारवाई न करण्यासाठी दराडेने दोघांकडे 10 हजार रुपये प्रत्येकी अशी लाच मागितली होती. हा प्रकार 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता घडला.

ही संपूर्ण घटना एका कौटुंबिक वादातून सुरू झाली. दौलताबाद परिसरातील एका तरुणाला पत्नीवर संशय असल्याने त्याने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीचा तपास लता दराडे हिच्याकडे आला. 25 नोव्हेंबर रोजी तिने तक्रारदार महिला आणि तिच्या मित्राला पोलीस ठाण्यात बोलावून कारवाई न करण्यासाठी लाच मागितली. या मागणीमुळे संतप्त झालेल्या दोघांनी थेट एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार दिली.
एसीबीने लाचेची मागणी खरी असल्याची खात्री करून सापळा रचला. तक्रारदारांनी दराडेला फोन केला असता, तिने आधी पोलीस ठाण्यात बोलावले पण उशीर झाल्याने ती घरी निघून गेली. पुन्हा फोन केल्यावर तिने दोघांना आपल्या घरी येण्यास सांगितले. एसीबी पथकाने तिच्या घराबाहेर सापळा लावला होता. महिला आणि तिच्या मित्राने घरात जाऊन 20 हजार रुपये तिच्याकडे दिले. लताने रक्कम स्वीकारताच तक्रारदार महिलेने केसात हात फिरवून ठरलेला इशारा दिला. त्यानंतर एसीबी पथकाने आत धाव घेत दराडेला रंगेहाथ पकडले.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, संगिता पाटील, सुरेश नाईकनवरे, शशिकांत सिंगारे आणि पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, महिला पोलीस अंमलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.






