छत्रपती संभाजीनगर: एखाद्या सस्पेन्स थ्रिलर (Crime News) सिनेमात शोभावं असं थरारक आणि तितकीच धक्कादायक घटना वाळूज परिसरातून समोर आली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका रिक्षाची तपासणी केली आणि जे दृश्य समोर दिसलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. रिक्षामध्ये घरगुती सामानाच्या आड, एका गादीत चक्क २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गुंडाळून नेला जात होता.

वाळूज पोलिसांचे पथक तिसगाव चौफुली भागात नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. एका रिक्षामध्ये गादी आणि संसारोपयोगी साहित्य भरलेलं पाहून पोलिसांनी ती रिक्षा थांबवली. रिक्षवाला आणि सोबत असलेल्यांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी झडती घेतली आणि पोलिसांना तरुणीचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तातडीने तरुणीच्या पालकांना ताब्यात घेतलं.
प्राथमिक चौकशीत तरुणीच्या सावत्र आईने हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितलं. “मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेतला. समाजात बदनामी होईल या भीतीने आम्ही कोणालाही न सांगता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी घेऊन जात होतो,” अशी कबुली तिने दिली. मात्र, एका तरुण मुलीने आत्महत्या केल्यावर पोलिसांना कळवण्याऐवजी तिचा मृतदेह सामानासारखा गुंडाळून नेणं, ही बाब पोलिसांना पचनी पडली नाही. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.







