पुणे: पुणे शहराच्या सार्वजनिक (Pune News) वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या पुणे मेट्रोच्या विस्ताराला आता राज्य सरकारने ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. हडपसर ते खडकवासला आणि माणिकबाग ते नळस्टॉप या दोन महत्त्वाच्या मार्गांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता हा सध्या भीषण वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो. माणिकबाग ते नळस्टॉप जोडणीमुळे हजारो आयटी कर्मचारी आणि नोकरदारांचा प्रवास केवळ 15-20 मिनिटांवर येईल. दुसरीकडे, हडपसर ते खडकवासला मार्गिकेमुळे पूर्व आणि पश्चिम पुणे एकमेकांशी जोडले जाऊन सोलापूर रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल.

खडकवासला ते हडपसर (मार्गिका क्र. 4): हा मार्ग सुमारे 25.5 किलोमीटरचा असून यावर 22 स्थानके असतील. यामुळे धरण परिसर थेट शहराच्या मुख्य भागाशी जोडला जाईल.
माणिकबाग ते नळस्टॉप: सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ही 6.12 किलोमीटरची उपमार्गिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
राज्य सरकारच्या मान्यतेनंतर आता महामेट्रो आणि केंद्र सरकारमध्ये सामंजस्य करार होईल. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल.







