Crime News : बीड : वडवानी तालुक्यातील लोणवाल गावात पोलिसांनी अवैध गांजा लागवडीवर मोठी कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 22 किलो वजनाचा हिरवा गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक वर्षा घागडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लोणवाल येथील एका शेतावर छापा टाकला. या वेळी शेतामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गांजाची झाडे उपटून जप्त केली.
या कारवाईदरम्यान एकूण 21.960 किलो हिरवा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची अंदाजे किंमत बाजारभावानुसार सुमारे 5.49 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात शेतजमिनीच्या मालकीण आशाबाई औदुंबर शिंगारे (वय 43) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी वडवानी पोलीस ठाण्यात नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची लागवड आणि त्याचा साठा बाळगल्याप्रकरणी संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कनवट आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गांजामागे कोणते मोठे जाळे आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवैध अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.







