Crime News: बीड : एका विभक्त महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका पोलिस कर्मचाऱ्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडित महिलेच्या वैयक्तिक अडचणींचा फायदा घेत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने बीड आणि धाराशिव येथील पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. (Beed Crime)

हेही वाचा- लोणी काळभोर येथे दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, दोघेजण जखमी तर 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
पीडित महिला सन 2022 पासून पतीपासून वेगळी राहत होती. या परिस्थितीचा फायदा घेत धाराशिव येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्याशी संपर्क साधला. आपण पोलीस असल्याने न्यायालयीन कामात मदत करतो, असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. तसेच स्वतःचे वैवाहिक आयुष्य बिघडले असून लवकरच घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले, असे तक्रारीत नमूद आहे.
10 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीने महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आश्वासन देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या वेळी आरोपीने काही औषधांचे सेवन केल्यामुळे महिलेला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले असून टाके घालावे लागल्याचेही तक्रारीत नमूद आहे. उपचाराचा खर्च आरोपीने ऑनलाइन पद्धतीने भरल्याची माहिती समोर आली असून तो पुरावा म्हणून महत्त्वाचा मानला जात आहे.
काही दिवसांनंतर महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने नकार देत अपमानास्पद वागणूक दिली. आपण पोलीस असल्याने कुणीही आपले काही बिघडवू शकत नाही, अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच खासगी फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद आहे.
या घटनेमुळे पोलिस दलातील काही व्यक्तींकडून कायद्याचा गैरवापर होत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पीडित महिलेने बलात्कार, गंभीर इजा, धमकी आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.







