Crime News: अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार (Bunty Jahagirdar murder case) याची बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. एवढ्या मोठ्या आणि चर्चेत असलेल्या प्रकरणातील आरोपीची अशा पद्धतीने हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बंटी जहागीरदार हा कब्रस्तानमधून आपल्या घरी परतत होता. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी रस्त्यातच त्याच्यावर गोळीबार केला. परिसरात नागरिकांची ये-जा सुरू असतानाही हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर आरोपी तातडीने घटनास्थळावरून पळून गेले.
गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत बंटी जहागीरदारला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. या हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.
अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे यांना कोपरगाव हद्दीतून अटक केली. जिल्हाभर लावलेल्या कडक नाकाबंदीमुळे आरोपी पळून जाण्यात अपयशी ठरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस कोठडीत घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी बंटी जहागीरदारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मयत जहागीरदारची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येमागील नेमके कारण, कट आणि इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







