छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (Crime News) शहरात एका हॉटेलमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या ३ तासांत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ३० तरुणी एका ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. तिथे ती 105 क्रमांकाच्या रूममध्ये थांबली होती. काही कामानिमित्त ती रूमबाहेर गेली आणि परत येताना चुकून 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या रूममध्ये शिरली. याच रूममध्ये तीन तरुण दारू पीत बसले होते. महिला दिसताच नराधमांनी तिला पकडले आणि जबरदस्तीने बिअर पाजली. त्यानंतर या तिघांनी रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
हा भयानक प्रकार पहाटे 2 ते 4 च्या सुमारास घडला. या नराधमांच्या तावडीतून सुटण्यात त्या महिलेला यश आले आणि ती ओरडत हॉटेलच्या बाहेर पळाली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून भरवस्तीतील हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.







