Crime News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी दुपारी एक प्रकार समोर आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एका बॅगेत एअरगन आढळून आली. सुरुवातीला ती पिस्तूल असल्याची चर्चा पसरली होती. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर ती एअरगन असल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश संतोष होळकर (वय 21) हा तरुण या प्रकरणात संबंधित आहे. तो बीएस्सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळवण्यासाठी त्याला आमदारांचे शिफारसपत्र घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार तो शुक्रवारी सायंकाळी आमदारांच्या कार्यालयात गेला होता. काम आटोपल्यानंतर बाहेर पडताना त्याची बॅग तिथेच राहिली.
शनिवारी दुपारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका कोपऱ्यात ठेवलेली बॅग दिसली. संशय आल्याने बॅग तपासली असता त्यात पिस्तूलसारखी दिसणारी वस्तू आढळली. खबरदारी म्हणून तात्काळ क्रांती चौक पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅग ताब्यात घेतली आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात ती एअरगन असल्याचे समोर आले.
पोलिसांनी रितेशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सुमारे 6 महिन्यांपूर्वी ऑनलाइन खरेदीतून हौस म्हणून एअरगन घेतल्याचे सांगितले. नोकरीच्या कामासाठी भेट दिल्यानंतर बॅग विसरल्याचेही त्याने स्पष्ट केले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र सत्य समोर आल्यानंतर परिस्थिती शांत झाली.







