Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhajinagar Latest Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (Ganesh Temkar Death) (वय ३० वर्ष) यांचा मृतदेह शुक्रवारी (ता. १४) दुपारच्या सुमारास हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गंगापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गणेश टेमकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?
याबाबत स्थानिक सरपंच आसिफ पटेल यांनी मृतदेह आढळल्यानंतर तातडीने गंगापूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवला आहे.
हेही वाचा: नवले ब्रीज अपघातात दहावीच्या मुलीने गमावली आईची सावली
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
मृतदेहावर कोणत्याही प्रकारे मारहाण किंवा शस्त्राने हल्ला केल्याचे आढळून आले नाही. तसेच, कोणत्याही वाहनाने धडक दिल्याचेही आढळून आले नाही. यामुळे, टेमकर यांच्या मृत्यूमागील गूढ वाढले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा
गणेश टेमकर हे भालगाव येथील रहिवासी होते. त्यांचे अचानक झालेले निधन भाजपच्या स्थानिक वर्तुळासाठी धक्कादायक मानले जात आहे. त्यांच्या निधनाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये व गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा: इंदापूर: अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त







