बीड: जिल्ह्यातून संतापजनक प्रकार समोर आला आहे. माजलगाव तालुक्यातील एका गावात ऊसतोडणीसाठी आलेल्या छत्तीसगड येथील मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक दोघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Beed Crime)

समोर आलेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील एका गावात छत्तीसगड राज्यातून सुमारे 14 कुटुंबे ऊसतोडणीच्या कामासाठी आली होती. मुलींचे आई वडील नातेवाईक 24 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळी शेतात ऊस तोडणीसाठी गेले असताना दोन अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच होत्या. वेळ साधून गावातील दोन तरुणांनी मुलींना फसवले आणि बाहेर घेऊन गेले.
दरम्यान यातील एक किराणा दुकानदार तर दुसरा ट्रॅक्टर चालक असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी दोन्ही अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने शेतांमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अत्याचार करून आरोपींनी मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलींनी घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, चार दिवसांनंतर, 28 डिसेंबरला त्यातील एका पीडितेने घडलेली घटना आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर दुसऱ्या मुलीनेही सांगितले.
घडलेला प्रकार ऐकून ऊसतोड मजुरांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.






