Beed Crime : बीड : बीड (Beed) जिल्ह्यात सोनारावर तिखट चटणी फेकून लूट करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत 6 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना 21 फेब्रुवारी रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. एक सोनार दुचाकीवरून सोने विक्रीसाठी जुन्या दिघोळअंबा रोडने जात असताना होळ ते दिघोळअंबा दरम्यान दोन मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी त्याला अडवले. आरोपींनी अचानक त्याच्या डोळ्यात तिखट चटणी फेकली. त्यामुळे त्याला नीट दिसेनासे झाले. त्यानंतर मारहाण करून त्याच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी हिसकावून आरोपी पळून गेले.
घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सुमारे 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची ओळख पटली. पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहित रणजित धिमिधिमे, अभिषेक अशोक घाटुळ, कानिफनाथ विलास बुरकर, यशोदीप कल्याण किसान, सुदाम मारुती सोनवणे आणि वीरसिंग ऊर्फ रणजितसिंग टाक यांचा समावेश आहे. आरोपींकडून लुटलेले सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने माहिती देण्यास सांगितले आहे.


