रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील एका (Shocking News) तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवून सायबर स्लेव्हच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याची (Ratnagiri News) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरघोस पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीने पीडित तरुणाला कंबोडियाला पाठवले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आणि फसवणुकीच्या कामात जबरदस्तीने अडकवण्यात आले. सुटका करून भारतात परतल्यानंतर संबंधित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील आयुष (नाव बदलले आहे) हा तरुण मुंबईतील एका जॉब एजन्सीशी संपर्कात आला होता. त्या एजन्सीतील एका तरुणीने आयुषला कंबोडियामध्ये दरमहा 1 लाख रुपये पगाराची डाटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून आयुषने स्वतःचे लाखो रुपये खर्च करून कंबोडियाला जाण्याचा निर्णय घेतला.
कंबोडिया विमानतळावर उतरल्यावर त्याला 3 ते 4 चिनी नागरिक घेण्यासाठी आले. त्यांनी त्याला एका कंपनीत नेले. मात्र तिथे डाटा एन्ट्रीचे काम देण्याऐवजी कस्टमर केअर एक्झिक्युटीव्ह म्हणून नेमणूक करण्यात आली. हे काम लोकांची मदत करण्यासाठी नसून भारतीय नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे होते.
हा प्रकार लक्षात येताच आयुषने काम करण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनीतील लोकांनी त्याला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला. कंपनीच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. स्थानिक पोलीस किंवा प्रशासनाशी संपर्क करण्यासही त्याला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आयुष तब्बल 4 महिने सायबर स्लेव्ह म्हणून त्या कंपनीत अडकून राहिला.

कसेबसे सुटून आयुष भारतात परतला असून त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना परदेशात नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्या तरुणांसाठी गंभीर इशारा ठरत आहे.






