मालवण: दोन डिसेंबरला होणाऱ्या (Maharashtra Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग (Nilesh Rane) जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कणकवली (Ravindra Chavan) नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत असल्याने तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूने मोठे नेते प्रचारात उतरले असून वातावरण चिघळत चाललं आहे. याच दरम्यान शिवसेना नेते व आमदार निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे मोठी खळबळ उडाली.

निलेश राणे यांच्या मते, मालवण येथील भाजप पदाधिकारी विजय केंजवडेकर यांच्या घरी तब्बल 25 लाख रुपये बेहिशेबी निधी आढळल्याचा दावा त्यांनी व्हिडिओसह केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राणे म्हणाले की ही रक्कम हिरव्या पिशवीत ठेवली होती. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की चव्हाण मालवणमध्ये आल्यानंतर संशयास्पद हालचाली वाढतात आणि काही घरांमध्ये पैशांच्या पिशव्या पोहोचवल्या जातात.
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून विरोधकांची पकड सुटत असल्याने ते अशा प्रकारे पातळी सोडून आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की नारायण राणे व नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रात चांगले काम झाले आहे आणि युती नसल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना व्यवसाय करू नये असा कायदा नाही.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजप पैशांच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचे आरोप केले आणि स्टिंग ऑपरेशन उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे आभार मानले. त्यामुळे शिवसेना–भाजप संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून निवडणूक अधिक संवेदनशील वातावरणात जाणार असल्याचे संकेत आहेत.






