Farmer Loan Waiver : मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भारणे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, दीर्घकाळापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून ही अंतिम मुदत जाहीर केली होती. कृषिमंत्री भरणे यांनी शनिवारी या घोषणेचा पुनरुच्चार करत सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकरी सतत नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे अनेकांचे पीक नुकसान झाले आहे. त्यातच बाजारभावातील चढउतार, उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेली पीककर्जे मोठ्या प्रमाणावर थकली आहेत.
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत असल्याने सरकारवर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफीची व्याप्ती, पात्रता आणि अंमलबजावणीची पद्धत ठरवणार आहे.
कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि 30 जूनपूर्वी प्रत्यक्ष कर्जमाफी लागू केली जाईल.
दरम्यान, सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलनाचे काम सुरू असून, कर्जमाफीसाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगण्यात आले आहे. 30 जूनची अंतिम मुदत जवळ येत असताना शेतकऱ्यांच्या नजरा आता प्रत्यक्ष कर्जमाफीकडे लागल्या आहेत.





