Central Railway : मुंबई: मध्य रेल्वेने होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. सणाच्या काळात प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी एकूण 186 विशेष गाड्या (Special Train) चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 94 होळी विशेष गाड्या आणि 92 नियमित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या देशातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर धावणार असून त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.

मुंबई ते नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे ते नागपूर, दानापूर, गोरखपूर, गाझीपूर सिटी आणि हजरत निजामुद्दीन या मार्गांवर विशेष गाड्या उपलब्ध असतील. काही गाड्या आठवड्यातून दोन वेळा तर काही गाड्या साप्ताहिक आणि दैनंदिन स्वरूपात धावतील. यामुळे सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरही होळीच्या निमित्ताने विशेष सोय करण्यात आली आहे. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान एकूण 8 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येकी दोन फेऱ्या दोन्ही बाजूंनी धावतील. त्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचा पर्याय मिळेल.
मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड विशेष गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मध्यरात्री 12:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी संध्याकाळी 5:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी रात्री 10:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता पोहोचेल. परतीची गाडी 27 फेब्रुवारी आणि 6 मार्च रोजी संध्याकाळी 5:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाड्यांमुळे होळीच्या काळातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.







