Sport News : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत बरंच काही चर्चेत आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला आणि संघाला क्लीन स्वीप मिळाला. (Sport News)

याच पार्श्वभूमीवर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी VVS लक्ष्मण यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती. मात्र आता या सगळ्या चर्चांवर बीसीसीआयने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने ठामपणे सांगितले आहे की त्यांनी VVS लक्ष्मण यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही – ना औपचारिक, ना अनौपचारिक. लक्ष्मण सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये क्रिकेट प्रमुख म्हणून काम करत आहेत आणि बोर्डाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की भारतीय संघाच्या नेतृत्वात कोणताही बदल करण्याचा विचार सध्या तरी नाही. गौतम गंभीर हेच बोर्डाचे पसंतीचे प्रशिक्षक असून त्यांचा करार संपेपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहणार आहेत. गंभीर यांचा करार 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे.
गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. टी-20 क्रिकेटमध्येही भारताने चांगली छाप पाडली आहे.
मात्र लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच कसोटीत भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. देशांतर्गत कसोटी मालिका असो किंवा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, भारताला अपेक्षित यश मिळालेलं नाही, हीच खरी चिंता आहे.
आता भारतीय संघाची पुढची मालिका श्रीलंकेविरुद्ध होणार असून, त्या मालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






