Ind vs NZ 2nd ODI : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला, तरी तो क्रिकेटविषयक मतांमुळे कायम चर्चेत असतो. आपल्या यूट्यूब चॅनेलवर अश्विन अनेकदा अशा गोष्टी मांडतो ज्या सहसा मैदानाबाहेर ऐकायला मिळत नाहीत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतरही त्याने असंच एक वेगळं मत मांडलं.

पहिल्या वनडेमध्ये भारताने 301 धावांचे लक्ष्य एक षटक शिल्लक असताना गाठले. मात्र हा विजय अजिबात सोपा नव्हता. एक वेळ अशी होती की भारताची धावसंख्या 234 वर दोन विकेट्स अशी मजबूत स्थितीत होती. पण त्यानंतर अचानक विकेट्स पडू लागल्या आणि सामना चुरशीचा झाला. अखेर केएल राहुलने संयमाने फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. (Ind vs NZ 2nd ODI)
या सामन्यानंतर अश्विनने भारतापेक्षा न्यूझीलंड संघाचं जास्त कौतुक केलं. तो म्हणाला की न्यूझीलंडचा संघ अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने खेळतो. त्यांची खेळाची शैली पूर्णपणे रणनीती आणि आकडेवारीवर आधारित असते. इतकंच नाही, तर न्यूझीलंड संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये बसून त्यांच्या बैठकांमधील नियोजन समजून घेण्यासाठी आपण पैसे द्यायलाही तयार आहोत, असं अश्विनने म्हटलं.
अश्विनच्या मते, न्यूझीलंड संघात सध्या काही प्रमुख खेळाडू नाहीत आणि कागदावर हा संघ इतर मोठ्या संघांपेक्षा कमकुवत वाटतो. मात्र शिस्तबद्ध खेळ, उत्तम क्षेत्ररक्षण आणि स्पष्ट योजना यामुळे ते कोणत्याही संघाला शेवटपर्यंत झुंज देतात. न्यूझीलंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाही, हीच त्यांची मोठी ताकद असल्याचंही अश्विनने सांगितलं.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे होणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे.







