न्हावरे (पुणे): न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर पिंपळसुटी (ता.शिरूर) येथील चौकात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये उरळगाव येथील एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. रोहिदास देवराम बिडगर (वय-२७, रा.उरळगाव, ता.शिरूर, जि.पुणे) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाचे नातेवाईक अतुल नाथा बिडगर (वय-३०, रा.उरळगाव, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रोहिदास देवराम बिडगर व अर्जुन सुखदेव बिडगर हे दोघे कामानिमित्त दुचाकीवरून न्हावरे मार्गे काष्टीला जात होते. याच दरम्यान पिंपळसुटी (ता.शिरूर) येथे एका चौकामध्ये आले असता, समोरून चुकीच्या बाजूने भरधाव वेगात एक अज्ञात दुचाकीस्वार आला. त्याने बिडगर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहिदास बिडगर याचा मृत्यू झाला, तर अर्जुन बिडगर याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुचाकीस्वाराने पलायन केले असून, शिरूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिरूर पोलीस घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.