यवत, ता. 17: यवत (Yavat) येथील माहिती अधिकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य व ‘पुणे प्राईम न्यूज’चे वार्ताहर राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना ‘माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन’तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला.

सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशनात हा सन्मान देण्यात आला. कार्यक्रमास निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर, महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली.
अधिवेशनात कार्यकर्त्यांना अमूल्य मार्गदर्शन करताना जितेंद्र भावे यांनी “माहिती अधिकार कार्यकर्ते कागदावर लढतात तर निर्भय महाराष्ट्र पार्टी रस्त्यावर लढते. दोघांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात काम केल्यास मोठा बदल घडू शकतो” असे मत व्यक्त केले. सुभाष बसवेकर यांनी माहिती अधिकाराबरोबरच इतर कायद्यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा: अजित दादा तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील पूलाचे काम लवकर सुरु करा…
दरम्यान, राहुल अवचट हे 2017 पासून माहिती अधिकार क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. त्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे व महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ते गेली 10 वर्षे माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील व तक्रारी याबाबत मार्गदर्शन करत असून कायद्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
“हा सन्मान माझा नसून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून पुढील काळात प्रत्येक नागरिकाला कायद्याची माहिती व्हावी व शासकीय अधिकाऱ्यांतील गैरसमज दूर व्हावेत यासाठी मी अधिक प्रयत्नशील राहणार आहे,” असे सांगत सर्व मार्गदर्शक, सहकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.”
-राहुल अवचट, सदस्य, राज्य कार्यकारणी माहिती अधिकार महासंघ







