पुणे : पुण्यातील टिंगरेनगर भागातून एक धक्कादायक आणि अमानुष घटना समोर आली आहे. एका तरुणाने मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आणि घृणा पसरली असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई मागणी केली आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या प्रकरणी होन्नापा अमोधीसिध्द होस्मानि या व्यक्तीच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही देखील टिंगरे नगर भागातील मास्टर कॉलनी मध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत असून, ज्या व्यक्तीविरोधात तक्रार केली आहे. तो व्यक्ती आपल्या घरासमोर राहत आल्याचं त्यांनी सांगितलं. हा व्यक्ती मिस्त्री असून ठिकठिकाणी तो बिगारी म्हणून काम करतो. अशी माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली.
फिर्यादी महिलेने पोलिसांना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती विनाकारण फिरस्त्या कुत्र्याला मारहाण करत होता. याविषयी आम्ही त्याला जाब विचारला असता त्याने आमच्यासोबत भांडण देखील केले. यादरम्यान, ३ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या आईने पाहिले की, होन्नापा हा एका फिरस्त्या कुत्र्याला उचलुन पत्र्याच्या रुममध्ये घेऊन गेला आणि दरवाजा बंद केला. काही वेळानंतर तो बाहेर आला आणि कुत्र्याला सोडून दिले. यावरून हा व्यक्ती मादी कुत्र्यावरती अत्याचार करून तिचा छळ करत असल्याचे दिसून आले. असे तक्रारीत सांगितले आहे. तक्रारदार महिलेने यापूर्वीही या व्यक्तीने कुत्र्यावर अत्याचार करुन त्यांचा छळ केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच याचा पुढील तपास देखील सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात असून, नागरिक कठोर कारवाईची मागणी करत आहेत.







