Solapur Accident : सोलापूर : सोलापूर शहरात आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध रूपाभवानी मंदिर परिसरात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात (Accident) इतका भयानक होता की, यामध्ये दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज पहाटे 4 च्या सुमारास झाला. मृत तिन्ही तरुण एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. रूपाभवानी मंदिर परिसरातील रस्त्यावरून जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की तिन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर लोकांची वर्दळ खूप कमी होती, मात्र अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे नागेच गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे तिन्ही तरुण ऐन उमेदीच्या वयातील होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे गवंडी, पोरे आणि चनशेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वेळी तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. अपघात केल्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. हा प्रकार हिट अँड रनचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्या आधारे फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






