Sikandar Shaikh vs Manish Rayate : पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी 2026’ स्पर्धेत कुस्तीप्रेमींचं लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींमध्ये स्टार पैलवान सिकंदर शेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सिकंदरने पुढील फेरीत प्रवेश मिळवत स्पर्धेतील दावेदारी अधिक मजबूत केली आहे. त्याने पुण्याच्या पैलवान मनीष रायतेचा 2-8 अशा फरकाने पराभव करत आपली श्रेष्ठता सिद्ध केली.

या लढतीची सुरुवात मात्र सिकंदरसाठी आव्हानात्मक ठरली. पहिल्या 2 मिनिटांत मनीष रायतेने आक्रमक खेळ करत 2 गुण पटकावले आणि सिकंदरला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. पहिल्या हाफमध्ये सिकंदर थोडा सावध दिसत होता. पण अनुभव आणि चपळाईच्या जोरावर त्याने दुसऱ्या हाफमध्ये खेळाचा रंगच बदलून टाकला.
मनीषला वॉर्निंग बेल मिळाल्यानंतर 30 सेकंदांत गुण मिळवण्यात अपयश आलं, आणि याच क्षणी सिकंदरने संधी साधली. स्टेपआऊटच्या चॅलेंजवरून त्याला 1 गुण मिळाला. त्यानंतर त्याने जलद हालचाली करत मनीषवर उलटवार केला आणि एकाच डावात तब्बल 4 गुण मिळवले. या टप्प्यावर सामना पूर्णपणे सिकंदरच्या बाजूने झुकला.
दरम्यान, लढतीत एक नाट्यमय क्षणही पाहायला मिळाला. झटापटीदरम्यान मनीषचा हात सिकंदरच्या नाकाला लागला आणि त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. काही क्षणांसाठी सामना थांबवावा लागला. पंचांनी मनीषला इशारा दिला. मात्र, सिकंदरने कोणताही खंड न पडू देता पुन्हा मैदानात उतरत जिद्दीने लढत सुरू ठेवली. यामुळे त्याची मानसिक ताकदही अधोरेखित झाली.







