Satara News: सातारा : नववर्षाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. आपल्या मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी गेलेला एक युवक अचानक बेपत्ता (Missing) झाला. मित्रांनी शोधाशोध केली, मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

हेही वाचा- पॅन-आधार लिंक ते डिजिटल फार्मर आयडी; नवीन वर्षात मोठे बदल, पाहा सविस्तर अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रमाहुली येथील आदित्य कांबळे हा युवक 31 डिसेंबरच्या रात्री आपल्या मित्रांसोबत कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. सर्व मित्र पार्टीमध्ये मग्न असताना, हॉटेलजवळ असलेल्या दरीचा अंदाज अंधारामुळे आदित्यला आला नाही. चालत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला. हा प्रकार लक्षात येताच मित्र घाबरून गेले आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच साताऱ्यातील छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीची वेळ, कडाक्याची थंडी आणि पूर्ण अंधार अशा कठीण परिस्थितीतही ट्रेकर्सनी बचावकार्य सुरू केले. दोरखंड, टॉर्च आणि इतर साहित्याच्या मदतीने ट्रेकर्स सुमारे 400 फूट खाली उतरले. शोध घेतल्यानंतर आदित्य जखमी अवस्थेत आढळून आला.
सुमारे 3 ते 4 तास चाललेल्या थरारक बचावकार्यानंतर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने आदित्यला सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आदित्यने सांगितले की, 31 डिसेंबरची पार्टी करत असताना परिसर पाहण्यासाठी मित्रांसोबत जात असताना त्याचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. वेळेत मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे कास पठार परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.







