Pune : पुण्यातील खडकवासला धरण परिसरात दर पावसाळ्यात निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. शिवणे–नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवर नवीन उंच पूल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुणे महापालिकेच्या तांत्रिक समितीकडून हिरवा कंदील मिळाला असून, अंतिम प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सध्या या भागातील विद्यमान पूल कमी उंचीचा असल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडले की तो वारंवार पाण्याखाली जातो. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करावा लागतो आणि हजारो नागरिकांना मोठा फटका बसतो. विद्यार्थी, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, तसेच दवाखान्यांकडे जाणारे रुग्ण सर्वांनाच दररोज सुमारे 1 ते 2 तासांचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. गेल्या काही वर्षांत या समस्येने गंभीर रूप धारण केले होते.
याच पार्श्वभूमीवर नव्या पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रकल्पानुसार सुमारे 250 मीटर लांबीचा आणि 24 मीटर रुंदीचा उंच पूल बांधला जाणार आहे. यासाठी अंदाजे 48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुलासोबतच नांदेड सिटीच्या प्रवेशद्वारापासून नदीकाठी सुमारे 150 मीटर लांबीचा जोडरस्ता तयार केला जाईल. नदीपात्रातील सुमारे 200 मीटर भागावर पूल असेल, तर शिवणे बाजूला सध्याचा 18 मीटर रुंद रस्ता वाढवून 24 मीटर करण्यात येणार आहे.







