Pune : पुणे शहरात राज्य पोलिस दलाच्या मोठ्या भरती प्रक्रियेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून यंदा तब्बल १५,३०० पदांसाठी भरती होत आहे. हजारो उमेदवार दररोज शारीरिक चाचणी आणि इतर प्रक्रियांसाठी हजर राहत असल्याने पाषाण परिसरात वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, पाषाण येथील अंतर्गत रस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात मुख्यालय परिसरात उमेदवारांची मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक बदलांनुसार, पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पुरंदर हॉल, बाणेर रोडपर्यंतचा मार्ग तसेच पाषाण रोडवरील पेट्रोल पंप ते बाणेर रोडवरील पेट्रोल पंप या दरम्यानची वाहतूक प्रभावित होणार आहे. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने पुणे विद्यापीठ चौक मार्गे पर्यायी मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सकाळच्या वेळेत विशेषतः आयटी पार्क, बाणेर–पाषाण परिसर आणि विद्यापीठ रस्ता या भागात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहित धरून प्रवासाचे नियोजन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान शिस्तबद्ध व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राज्यभरातील उमेदवार पुण्यात येत असल्याने स्थानिक वाहतुकीवर ताण वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







