Pune : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला सध्या वाहतूक कोंडीच्या विळख्याने ग्रासले आहे. रस्ते रुंदीकरणाला असलेल्या मर्यादा आणि उड्डाणपुलांसाठी अपुरी जागा, यावर महापालिकेने आता कायमस्वरूपी तोडगा शोधला आहे. शहरात तब्बल ५४ किलोमीटर लांबीचे भुयारी मार्ग (Tunnels) तयार करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला असून, हा प्रकल्प पुणे महानगरपालिका स्वतः राबवणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. (Pune)

PMRDA नाही, आता ‘महानगरपालिका’ घेणार पुढाकार
सुरुवातीला हा प्रकल्प ‘पीएमआरडीए’मार्फत राबवण्याचे नियोजन होते. मात्र, हे सर्व मार्ग महापालिका हद्दीतूनच जाणार असल्याने, प्रकल्पाची सूत्रे आता पालिकेने आपल्या हाती घेतली आहेत. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी आणि तांत्रिक बाबींसाठी पुढील महिन्यात एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. हा सल्लागार पुढील चार महिन्यांत प्रकल्पाचा ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (DPR) सादर करेल.
जुना आराखडा बासनात; कोंडीच्या ठिकाणीच होणार बोगदे
यापूर्वी प्रस्तावित असलेला ‘येरवडा ते कात्रज’ हा भुयारी मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने तितकासा प्रभावी ठरणार नसल्याचे आयुक्तांचे मत आहे. त्यामुळे जुन्या त्रुटी असलेला आराखडा बाजूला सारून, शहरातील मुख्य वर्दळीची ठिकाणे – जसे की शनिवारवाडा, स्वारगेट, बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता – या भागातील कोंडी फोडण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. जिथे कमी अंतरात जास्त वेळ वाहतुकीत जातो, तिथेच हे बोगदे तयार केले जातील.
निधीचे गणित: केंद्र आणि राज्य सरकार देणार साथ
हा प्रकल्प अब्जावधी रुपयांचा असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण येईल, अशी भीती होती. मात्र, आयुक्तांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळवला जाईल. दोन्ही सरकारांच्या आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी महापालिका प्रस्ताव पाठवणार असून, यामुळे पुण्याला मोठा विशेष निधी मिळण्याची चिन्हे आहेत.







