प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune police : शहर वाहतूक विभागाने नववर्षाच्या सुरुवातीलाच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजेपासून 1 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. (Pune Crime)
या कालावधीत पुणे शहरातील विविध भागांमध्ये 40 ठिकाणी नाकाबंदी करून एकूण 2128 वाहनांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 208 वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 51 वाहने मोटार वाहन कायद्यानुसार जप्त करण्यात आली असून, विविध उल्लंघनांपोटी 70 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Pune Police)
दरम्यान, नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पुणे शहरातील 30 वाहतूक विभागांमार्फत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 486 वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तसेच संपूर्ण सन 2025 मध्ये पुणे शहर वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 6765 वाहनचालकांविरुद्ध खटले दाखल करून ते न्यायालयात सादर केले असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त (वाहतूक) श्री. हिंमत जाधव यांनी दिली.
वाहतूक विभागाने नागरिकांना मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि स्वतःसह इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन केले आहे.







