Pune News : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. अनेक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात आहे. मात्र पुण्यात एक वेगळाच आणि चर्चेचा प्रकार समोर आला आहे. (Pune News)

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ (ड) घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या गणेश किरण खानापुरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी अर्जासाठी लागणारी अमानत रक्कम थेट चिल्लर नाण्यांमधून भरली. नोटांऐवजी मोठ्या पिशव्यांमध्ये आणलेली नाणी पाहून निवडणूक कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
नियमांनुसार अमानत रक्कम स्वीकारणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांना ही चिल्लर मोजावी लागली. मात्र नाण्यांची संख्या मोठी असल्याने ती मोजताना कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली. बराच वेळ या प्रक्रियेत गेल्याने कार्यालयातील कामकाजही काही काळ खोळंबले. सर्व नाणी मोजून रक्कम पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर अखेर खानापुरे यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला.
या अनोख्या प्रकारामुळे कार्यालयात उपस्थित नागरिक, कर्मचारी आणि इतर उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामागचं कारण सांगताना गणेश खानापुरे म्हणाले की, सामान्य माणसाकडे रोजच्या व्यवहारातून साचलेली चिल्लरच जास्त असते. सामान्य नागरिकांचं प्रतिनिधित्व निवडणुकीत व्हावं, हा संदेश देण्यासाठीच मी अमानत रक्कम नाण्यांमधून भरली. नागरिकांनी मला जमेल तसे पैसे दिले, तेच मी आज भरले आहेत. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या अनोख्या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, महानगरपालिका निवडणुकीआधीच निवडणूक वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसून येत आहे.






