Pune Accident: विमान नगर: पुण्यातील विमान नगर परिसरातील म्हाडा कॉलनीजवळील गंगापुरम चौकात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला रस्त्याच्या कडेला चालत असताना एका बसने तिला जोरदार धडक दिली. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. Bus Accident News

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे वाहतुकीची वर्दळ सुरू असताना गंगापुरम चौकात ही दुर्घटना घडली. वळण घेत असताना बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या महिलेला धडक दिली. या धडकेत महिला खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका गंभीर होता की महिलेचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बसने महिलेला धडक दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या फुटेजच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
पोलिस उपायुक्त झोन 7 सोमय मुंडे यांनी सांगितले की, संबंधित बस चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी महिला रस्ता ओलांडत किंवा रस्त्याच्या कडेला चालत होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चालकाने दारू प्यायली होती का, याबाबत कोणतेही प्राथमिक माहिती आढळले नाहीत. मात्र आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अपघातानंतर गंगापुरम चौकातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या कनीज सुखराणी यांनी या चौकातील पायाभूत सुविधांमधील त्रुटींवर लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, या चौकात तीन रस्ते दुतर्फा वाहतुकीसाठी असून एक रस्ता एकेरी आहे. या रचनेमुळे वाहनचालक गोंधळात पडतात आणि अपघाताचा धोका वाढतो.






