Pune News : दौंडकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दौंड बसस्थानक आणि एसटी आगाराच्या नूतनीकरणासाठी अखेर ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार अॅड. राहुल कुल यांनी या कामासाठी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून राज्य शासनाच्या परिवहन व गृह विभागानं या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. (Pune News)

सध्या दौंड बसस्थानकाची अवस्था चांगली नाही, कर्मचाऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. हे लक्षात घेऊन आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी लावून धरली होती. अखेर ३१ डिसेंबर २०२५ रोजी शासन निर्णय जाहीर झाला आणि बसस्थानकाच्या कायापालटाचा मार्ग मोकळा झाला.
या मंजूर निधीतून बसस्थानक आणि आगाराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. मुख्य आगार इमारत पूर्णपणे दुरुस्त केली जाणार असून चालक-वाहकांसाठी टॉयलेटसह आरामदायी विश्रांतीगृह उभारलं जाणार आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह तर लाईन चेकिंग पथकासाठी वेगळी खोलीही असणार आहे.
तसंच २ कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक खर्चून आगार आणि बसस्थानक परिसराचं काँक्रीटीकरण केलं जाणार आहे. यामुळे पावसाळ्यातला चिखल आणि उन्हाळ्यातली धूळ कायमची इतिहासजमा होणार आहे. याशिवाय कॅश इशू सेक्शन, लेखा विभाग आणि आगार व्यवस्थापकांसाठी नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत. पाणी साठवणुकीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक अग्निशमन व्यवस्था, संरक्षण भिंत आणि नवीन प्रवेशद्वारही उभारण्यात येणार आहे.
काम सुरू करण्याआधी वास्तुविशारदांकडून नकाशे मंजूर करून घेतले जाणार असून तांत्रिक परवानग्याही आवश्यक असतील. काम दर्जेदार व्हावं यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निधीमुळे दौंडमधील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे, आणि आता बसस्थानकाचं काम कधी सुरू होतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.







