Pune News : सिंहगड रोडवर धायरी फाटा चौकात मंगळवारी संध्याकाळी ट्रॅफिक पोलिस ड्युटीवर होते. तेव्हा एक दुचाकी थेट ट्रिपल सीटवर येताना दिसली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे गाडी अडवली आणि दंडाची कारवाई सुरू केली. पण एवढ्यातच तीन तरुण भडकले.

“आमच्यावर दंड कशासाठी?” असं म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. बघता बघता वाद इतका वाढला की थेट हात उचलण्यापर्यंत मजल गेली. तिघांपैकी एकाने पोलीस हवालदाराच्या कानशिलात मारली, तर बाकी दोघांनी आरडाओरड करत त्यांचा गणवेश ओढून फाडला. हे सगळं भर चौकात, लोकांसमोर घडलं. (pune police)
जखमी झालेले पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर हे सिंहगड रोड वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. या प्रकरणात नऱ्हे पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही आधीपासून पोलीस रेकॉर्डवर असलेले सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (pune news)
पुण्यात गेल्या काही दिवसांत ट्रॅफिक पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार वाढताना दिसत आहेत. हडपसर, पुणे स्टेशननंतर आता धायरीतही असा प्रकार घडल्यामुळे पोलीस दल सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ट्रॅफिक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कारवाईदरम्यान नेमकं काय घडलं हे रेकॉर्डमध्ये राहील.
दरम्यान, गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी तब्बल १८ लाख बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ५४ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याची माहितीही समोर आली आहे. म्हणजे नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये, उलट पोलिसांवरच हात उचलण्याचे प्रकार वाढतायत, हीच खरी चिंता आहे.







