Pune Metro : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी पुणे मेट्रोला चांगलाच पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरून तब्बल ६ कोटी ७१ लाख लोकांनी प्रवास केला. एवढंच नाही तर तिकीट विक्रीतून महामेट्रोला १०५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन्ही मार्गिका मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्णपणे सुरू झाल्या. सुरुवातीपासूनच प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेला. नव्या वर्षात ही संख्या आणखी वाढली आणि जून महिन्यात पहिल्यांदाच ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला. (pune metro)
सणासुदीच्या काळात, विशेषतः गणेशोत्सवात मेट्रोला प्रचंड गर्दी झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तर प्रवासी संख्या ७० लाखांच्या पुढे गेली, तर उत्पन्नाने १० कोटींचा आकडा पार केला. यामध्ये सप्टेंबर महिना सर्वात गजबजलेला ठरला. त्या एकाच महिन्यात जवळपास ७५ लाख लोकांनी मेट्रोचा वापर केला, आणि सुमारे ११ कोटी ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दिवाळीनंतर थोडीफार घट झाली असली, तरी आजही दररोज साधारण दोन लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. मार्गिकांपैकी वनाझ ते रामवाडी हा मार्ग सर्वाधिक व्यस्त ठरला असून, या मार्गावर वर्षभरात ३ कोटी ६५ लाख प्रवासी प्रवासात होते. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर ३ कोटी ५ लाख प्रवाशांची नोंद झाली.
आता पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही मार्गिका मार्च २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटी पार्क परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, पुणे मेट्रोचे जाळे आणखी मजबूत होणार आहे.







