Pune : हडपसर ते यवत सहा पदरी उन्नत महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या महिनाभरात करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. त्याचबरोबर पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि नाशिक फाटा-खेड या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन हि याच महिन्यात होणार असल्याची माहिती ही यावेळी मंत्री गडकरी यांनी दिली.

हडपसर-यवत मार्गावर सहा पदरी उन्नतमार्ग उभारला जाणार असून त्यासाठी सुमारे 7 हजार 515 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात खराडी-विठ्ठलवाडी दरम्यान 31 किमी लांबीचा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. तसेच भविष्यात उपनगरांसह ग्रामीण भागात मेट्रोचा विस्तार होणार असल्याने महामार्गांवरील उड्डाणपुलांची रचना करताना मेट्रोच्या संभाव्य मार्गाचा विचार करूनच खांबांची रचना करावी, अशा सूचनाही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे पुणे महानगर परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेष म्हणजे खराडी ते विठ्ठलवाडी दरम्यान तब्बल 31 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. स्थानिक वाहतूक खालच्या रस्त्याने तर लांब पल्ल्याची वाहतूक उड्डाणपुलावरून होणार असल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
गडकरी म्हणाले की, पुणे-शिरूर महामार्ग पुढे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव आहे. शिरूर ते संभाजीनगर हा सुमारे 192 किमी लांबीचा सहा पदरी महामार्ग असणार असून त्यासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार झाला आहे.
नाशिक फाटा ते खेड दरम्यान सुमारे 32 किमी लांबीचा सहा पदरी महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी सुमारे 5 हजार 265 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यात नाशिक फाटा ते चाकणदरम्यान मेट्रो मार्ग सुरू करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी पागोटे ते चौकदरम्यान 32 किमी लांबीचा ग्रीनफील्ड सहा पदरी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या दीड तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील लोणावळा परिसरातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. या चार महामार्ग प्रकल्पांमुळे पुणे महानगर परिसरातील वाहतुकीला नवी दिशा मिळणार असून औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.







