Pune Election : पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची पत्नी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात लक्ष्मी आणि सोनाली आज सकाळी पुण्यात दाखल झाल्या असून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता यावा, यासाठी न्यायालयाने बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना सशर्त परवानगी दिली आहे. कोर्टाने स्पष्ट आदेश दिले असून अर्ज भरताना कोणतीही मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करता येणार नाही. पोलिस बंदोबस्तातच ही प्रक्रिया पार पाडायची आहे.
त्याच पार्श्वभूमीवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाबाहेर आधीच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळात बंडू आंदेकर यालाही अर्ज भरण्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याआधी लक्ष्मी आणि सोनाली यांनी कार्यालयात हजेरी लावून अर्ज भरण्यास सुरुवात केली.
लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना कोल्हापूर कारागृहातून थेट पुण्यात आणण्यात आलं आहे. त्यांचा अर्ज भरून झाल्यानंतर बंडू आंदेकर अर्ज दाखल करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंडू आंदेकर प्रभाग क्रमांक २२ मधून, तर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.







