पुणे: राज्यात (ZP Election) सध्या महापालिका निवडणुकांच्या चर्चेसोबतच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषदांच्या निकालानंतर ग्रामीण भागातील राजकारणाचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होऊ शकते. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आयोगाने केले आहे.

पहिल्या टप्प्यात सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादेबाबत दिलेल्या आदेशामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली नाही, केवळ त्याच ठिकाणी सध्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदांबाबत २१ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ३१ जानेवारीची मुदत काही अंशी ओलांडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक आयोगाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार १० ते १७ जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालेल. त्यानंतर १८ ते २० जानेवारीला अर्जांची छाननी आणि माघार घेण्याची मुदत असेल. २१ जानेवारीला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल आणि ३० जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेचा निकाल ३१ जानेवारी रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. तत्पूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांची मोठी ओढाताण होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.







