उरुळी कांचन (पुणे): सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रलंबित निवडणुका 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्याचे निर्देश सोमवारी (ता.12) राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र, निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसतानाच पूर्व हवेली परिसरात मतदारांचा कौल मिळवण्यासाठी तसेच त्यांना आपलेसे करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून देवदर्शनाच्या नावाखाली मोफत सहली, पर्यटन, लकी ड्रॉ, वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबिरे व कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून मतदारांना लुभावण्याचे प्रयत्न होत आहेत.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुणे-सोलापूर व पुणे-नगर रस्त्यालगतच्या गावांमध्ये खासगी बसमधून तसेच रेल्वेच्या माध्यामातून देवदर्शन आणि पर्यटन सहलींचा सपाटा सुरू आहे. मतदार व कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असून, निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकजण आपला प्रभाव वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. काही ठिकाणी थेट आर्थिक प्रलोभने, भेटवस्तूंचे वाटप, जेवणावळी, तसेच योजनांची आश्वासने देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात विकासकामांची आश्वासने, लाभार्थी योजनांचा संदर्भ देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, श्रमकार्ड व हेल्थ कार्ड वाटप अशा कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन व पर्यटन यात्रा, तरुणांसाठी क्रीडा साहित्य वाटप, क्रिकेट सामने आणि ओल्या पार्टीपर्यंत कार्यक्रमांचे स्वरूप पोहोचले आहे.
थेऊर, सोरतापवाडी, केसनंद, पेठ, नायगाव, कुंजीरवाडी, आव्हाळवाडी आदी भागांत विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय इच्छुकांकडून या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. गृहसंकुलांजवळ पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन, नव्या कामांचे भूमिपूजन याचाही प्रचारासाठी वापर केला जात असल्याचे चित्र आहे.
थेऊरचे आरोग्य दूत व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, सोरतापवाडीचे माजी सरपंच व भाजपा नेते सुदर्शन चौधरी, केसनंदचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हरगुडे, पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी, नायगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष कृषिराज चौधरी, माजी सरपंच आण्णा महाडिक, भाजपा युवती अध्यक्ष पूजा सणस, सिद्धांत सचिन तुपे, कुंजीरवाडीचे विद्यमान सदस्य संग्राम कोतवाल, आव्हाळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संदेश आव्हाळे, व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आरोग्य शिबिरे, सहली, पर्यटन स्थळे, आदी समाज उपयोगी शिबिरांचे व देवदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय डावपेच की श्रद्धा?
देवदर्शन यात्रांच्या माध्यमातून महिला मतदारांना लक्ष्य करत लोकानुनय केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या उपक्रमांमागे श्रद्धेपेक्षा मतपेढी मजबूत करण्याची रणनीती अधिक स्पष्टपणे दिसून येत असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत अनिश्चितता असतानाही मोठ्या प्रमाणावर खर्च सुरू असल्याने नागरिकांमध्येही चर्चा रंगू लागल्या आहेत. देवदर्शन व पर्यटनाच्या नावाखाली मोफत प्रवास, भोजन व सुविधा दिल्या जात असल्याने अनेक मतदारांचा या उपक्रमांकडे ओढा वाढत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व नवमतदार यामध्ये उत्साह दिसून येत आहे.
धार्मिक स्थळांसोबत पर्यटनस्थळांना भेटी दिल्या जात असल्याने काही प्रमाणात सामाजिक संवाद व पर्यटनाला चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात असले तरी, या सर्व घडामोडींमागे सामाजिक कामापेक्षा राजकीय गणित अधिक ठळक असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
मतदारांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे
दरम्यान, मतदारांनीही जागरूक राहून अशा प्रकारांना बळी न पडता लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे, तसेच “मतदान हा नागरिकांचा हक्क असून तो कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, विकास आणि प्रामाणिक नेतृत्वाचा विचार करून बजवावा,” असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रामीण व शहरी विकासाचा पाया मानल्या जातात. त्यामुळे या निवडणुका पारदर्शक, निर्भय आणि प्रामाणिक वातावरणात पार पडाव्यात, यासाठी निवडणूक यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे जबाबदारी पार पाडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.







