संदीप बोडके

उरुळी कांचन, ता. 17: शेतकऱ्यांचे सातबारा संबंधित काम करायचं.. पण ते मुद्दामहून उशिराने करायचं..! असा भसमा रोगच उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तलाठी कार्यालयाला जडला आहे. त्यामुळे या रोगाच्या व्हायरसमधून तहसीलदार तृप्ती कोलते यांचे आदेश देखील सुटलेले नाहीत. एकूणच वरिष्ठांच्या आदेशाला विलंबाच्या फाट्यावर मारण्याचा प्रकार उरुळी कांचन तलाठी कार्यालयात सुरू आहे. (Uruli Kanchan Talathi Office)
तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल हे हजर नसताना खाजगी इसम हे तलाठी कार्यालय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच “पुणे प्राईम न्यूज” ने व्हिडीओ व बातमीच्या माध्यमातून प्रशासन व जनतेसमोर मांडला आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी व कारवाईबाबतचा ‘च’ व ‘क’ चा अजूनही श्रीगणेशा झालेला नाही. त्यातच मौजे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सातबारातील चूक दुरुस्ती आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी प्रियंका सुंदर्डे यांचा विलंबाचा व्यासंग समोर आला आहे.
हेही वाचा: पुण्यात ठाकरे अन् शिंदे सेना एकत्र लढणार! अर्जाच्या शेवटच्या दिवशी मोठा निर्णय…
मौजे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गट नंबर 1315/1 या सातबारा मधील झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आरटीएस/155/एस आर/74/2025 अन्वये आदेश झाला आहे. लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी 22 ऑगस्टला संबंधित आदेश पारित केला आहे. मात्र तो आदेश तब्बल एक महिन्याने तलाठी सुंदर्डे यांनी ताब्यात घेतला आहे. व प्रत्यक्ष 7/12 दुरुस्तीसाठी फेरफार 10 नोव्हेंबरला घेण्यात आला आहे. म्हणजे आदेश तयार झाला 22 ऑगस्टला, मात्र तलाठ्याने त्यांचा फेरफार टाकला 10 नोव्हेंबरला असा तब्बल अडीच महिन्यांचा विलंब तलाठ्याने लावला आहे.
केवळ12 किलोमीटर अंतर असलेल्या आदेशाला लागले अडीच महिने
लोणी काळभोर अपर तहसील कार्यालय ते उरुळी कांचन तलाठी कार्यालय यामध्ये सुमारे 12 किलोमीटरचे अंतर आहे. परंतु, अपर तहसील कार्यालयातून निघालेला आदेश उरुळी कांचन येथे पोहोचायला व फेरफार होण्यासाठी तब्बल अडीच महिने कालावधी लागला आहे. डिजिटल व ऑनलाईन सुविधा असतानादेखील हा महसूल विभागाचा कासवाच्या गतीने सुरु असलेला कारभार समोर आला आहे.
सातबारा दुरुस्तीच्या आदेशाला एवढा उशीर का झाला.? याबाबत उरुळी कांचनच्या तलाठ्यांना विचारायला लागेल. त्यानंतर विलंब झाल्याचे कारण समजेल. मग प्रतिक्रिया देता येईल?
-तृप्ती कोलते (अपर तहसीलदार , लोणी काळभोर, ता. हवेली)
हेही वाचा: सोन्याच्या खाणीत भूस्खलन; 101 जणांचा मृत्यू, अनेक लोक अद्याप बेपत्ता पहा Video…







