उरुळी कांचन, (पुणे): नायगाव (ता. हवेली) हद्दीतील प्रयागधाम ते पेठ रोड परिसरात (Uruli Kanchan News) असलेल्या ‘कबीर चायनिज सेंटर’ येथे एका अज्ञात इसमाने हॉटेल मालकावर बंदूक रोखून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 04 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हि घटना घडली असून बंदुकीतून गोळी न निघाल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिलिंद बापू शेलार (वय-38, व्यवसाय शेती व हॉटेल, रा. नायगाव, ता. हवेली) असे हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी मिलिंद शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात तीन इसमांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा गुरुवारी (ता. 12) दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद शेलार यांचे नायगाव हद्दीतील प्रयागधाम ते पेठ रोडचे कडेला मागील 15 दिवसांपूर्वीच ‘कबीर चायनिज सेंटर’ नावाने हॉटेल सुरु केले आहे. बुधवारी (ता. 04 फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मिलिंद शेलार हे हॉटेलमध्ये असताना बाहेर एक युनिकॉर्न मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम आले होते.
त्यापैकी एका इसमाने हॉटेलमध्ये येऊन थम्सअप व पाण्याची बाटली मागितली. त्याने 40 रुपये दिल्यानंतर मालकाने थम्सअप दिले व पाण्याची बाटली आणण्यासाठी मागे वळताच खाडखाड असा आवाज आला. मागे वळून पाहिले असता संबंधित इसमाने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदूक निकामी ठरल्याने गोळी बाहेर आली नाही.
शेलार हे जोरजोरात ओरडले व हॉटेलमधील खुर्ची त्याचे अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदरचा इसम हा जोरात बाहेर पळाला व बाहेर थांबलेल्या त्याच्या दोन साथीदारांसह दुचाकीवरून चारवाडा रोड परिसरात पळून गेला.
दरम्यान, गुरुवारी (ता. 05) सकाळी हॉटेल उघडल्यावर काउंटरजवळ बंदुकीच्या गोळीप्रमाणे वस्तू आढळून आली. त्यानंतर मालकाने उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच परिसरातील नागरिकांकडून चौकशी सुरू केली. घटनेनंतर मानसिक धक्का बसल्यामुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचे मालकाने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी विश्वास दिल्यानंतर शेलार यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोरांशी कोणतीही वैरभावना किंवा पूर्वीचा वाद नसल्याचे शेलार यांनी सांगितले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1), 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 3 आणि 25 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.







