पुणे: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावर आला. पाटस जवळील हॉटेल कंचन परिसरात एका सुसाट कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे 44 प्रवाशांनी भरलेली एसटी बस थेट उलटली. या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहे.

सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली ही बस आपल्या निर्धारित वेगात धावत होती. मात्र, मागून येणाऱ्या एका कंटेनर चालकाने अतिघाईत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. महामार्गावर सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, याचा अंदाज कंटेनर चालकाला आला नाही. त्याने बसच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. हा धक्का इतका तीव्र होता की, चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली घसरत जाऊन पलटी झाली.
अपघाताचा आवाज होताच परिसरातील हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता बसच्या दिशेने धाव घेतली. बसच्या खिडक्यांच्या काचा फोडून आणि मागील आपत्कालीन दरवाजातून एका-एका प्रवाशाला बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या 2-3 प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.







