लोणी काळभोर, ता. 16 : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन चौकात भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने इनोव्हा कारला घासून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (ता. 8) सायंकाळी घडली. या घटनेत स्विफ्ट कारचालक शाम दशरथ कावळे (वय 27, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, मूळ रा. धाराशिव) याच्यावर मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी इनोव्हा कारचालक मोहम्मदअझर मोहम्मदगौस शेख (वय 47, रा. कॅम्प, पुणे) यांनी बुधवारी (ता. 15) लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्नी आणि मुलांसह इनोव्हा कारने बारामती तालुक्यातील सुपा येथे दर्ग्याच्या दर्शनासाठी जात होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलजवळील लोणी स्टेशन चौकात पोहोचले. यावेळी महामार्गाच्या दुभाजकाजवळ ट्रक उभा असल्याने त्यांनी कार मधल्या लेनमधून पुढे घेतली. सिग्नलजवळ वाहतुकीचा वेग कमी केला असताना डाव्या बाजूने भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारचालकाने अचानक उजवीकडे वळण घेत त्यांच्या इनोव्हा कारच्या डाव्या बाजूला घासले.

दरम्यान, या धडकेत इनोव्हा कारच्या पुढील दरवाजाच्या खालच्या भागाचे नुकसान झाले. त्यावेळी सिग्नलजवळ उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी स्विफ्ट कारचालकाला थांबविले. कारचालकाच्या तोंडातून आंबट व उग्र वास येत असल्याने त्याने मद्यप्राशन केले असावे, असा संशय शेख यांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले.

कुटुंबीयांसह प्रवास करत असल्याने शेख हे पुढील प्रवासासाठी निघून गेले होते. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली. भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.






