लोणी काळभोर, ता. 11 : हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका सुरू ठेवत सभापती युवराज हिरामण काकडे यांनी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बुधवारी (ता.11) अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या अचानक पाहणीमुळे आरोग्य केंद्रात एकच खळबळ उडाली.

सभापती काकडे यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत का, औषधसाठा पुरेसा आहे का, स्वच्छतेची व्यवस्था कशी आहे तसेच महिला प्रसूतीगृहातील सुविधा याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि उपचार प्रक्रिया सुरळीत चालावी यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या तातडीच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना सभापती युवराज काकडे यांनी हवेली तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणांवर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. हवेली तालुक्यातील 71 गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या तसेच शाळांना अचानक भेटी देऊन तेथील समस्या प्रत्यक्ष पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन पंचायत समितीच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी युवानेते संदेश आव्हाळे, पंचायत समिती सदस्य कृषीराज चौधरी, माजी सरपंच संतोषदादा कुंजीर, माजी उपसरपंच भरत निगडे, संतोष कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमर कुंजीर, विकास निगडे, चंद्रकांत बारवकर, संजय झेंडे आदी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे आणि कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता.
सभापतींच्या या अचानक पाहणीमुळे आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनात हालचाल सुरू झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







